माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, वि. दा. सावरकर - विनायक दामोदर सावरकर हे महाराणा प्रतापांप्रमाणे देशाभिमानी देशभक्त होते. छत्रपती शिवरायांप्रमाणे धाडसी, पराक्रमी योद्धे होते. लोकमान्य टिळकांप्रमाणे एक द्रष्टे झुंजार नेते होते. पंडित नेहरूंप्रमाणे वैज्ञानिक दृष्टी असलेले थोर हळवे साहित्यिक होते. आणि आजच्या विषयासंदर्भापुरते बोलताना की सावरकर हे कवी कालिदास भवभूती, रवींद्रनाथ टागोर, शेक्सपीअर, शेले, कीट्स यांच्या तोलामोलाचे जागतिक कीर्तीने महाकवी होते. डॉ. के. ना. वाटवे, डॉ. प्र. न. जोशी, ता. गो. मायदेव यासारख्या थोर काव्यसमीक्षकांचे हे मत आहे. कमला, गोमंतक यांसारखी महाकाव्ये लिहिली म्हणून सावरकर कवी आहेतच; परंतु जीवनाचे भव्योदात्त दर्शन घडविणारे उज्ज्वल प्रतिभेचे कवी म्हणूनही सावरकर महाकवी आहेत. सावरकरांच्या काव्यात केशवसुतांचा क्रांतिकारक आदेश, गोविंदाग्रजांची उत्कटता, बालकवीचे निसर्गप्रेम, माधव ज्युलियनांचा स्वप्नाळूपणा, कुसुमाग्रजांची सात्त्विकता आणि भव्यता प्रतीत होते.
'हे ताऱ्यांनो जाणतसा का कुठूनही तुम्ही आला?
कुठे चालला कवण हेतू ह्या असे प्रवासाला!"
किंवा
'ऐश्वयें भारी । या अशा ऐश्वये भारी,
महाराज, आपुली कथा ना कुठे निघे स्वारी??
दिक्षितिजांचा देदीप्य रथ तुझा सुटता,
नक्षत्र कणांचा उठे धुराळा परता. '
यांसारख्या कविता कुसुमाग्रजांच्या पृथ्वीच्या प्रेमगीतांची आठवण करून देतात.
ओल्या मातीत सूर्याची किरणे पिळून तिथे
मृदू चेतन सोन्याची स्वर्ण चंपक! ही फुले
किंवा
'गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती तुंच जी विलसतसे लाली
यांसारख्या सावरकरांच्या कोमल कल्पना मनावर कुठे तरी हळुवार मोरपीस फिरवून जातात. सावरकर कुटुंब हे धगधगते देशभक्त यज्ञकुंड होते. त्यांची उक्ती, कृती आणि काव्य ही मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आहुतीच होती.
हे काय बंधू असतो जरी सात आम्ही
त्वत्स्थंडीलात असते दिधले बळी मी !
त्वत्स्थंडीली ढकलली गृहवित्तमता, दावानलात वहिनी, नवपुत्र कांता ।
त्वत्स्थंडीलीच बघ आता ममदेह ठेला ।'
सावकरांच्या देशभक्तीला जगात तोड नाही. मातृभूमीसाठी त्यांच्या भावना अगदी कोमल हळुवार बनतात. त्यांचे व्याकुळ मन मातृभूसाठी तळमळते, तेव्हा सहजपणे आर्त स्वर निघतात.
ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला।
कधी कधी सावकरांचे शब्द व्यास-वाल्मीकींच्या सारखे दिव्य आणि प्रासादिक वाटतात.
'की घेतले व्रत न आम्ही अंधतेने
लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने
जे दिव्य दाहक म्हणुनी असावयाचे बुद्ध्याची वाण धरीले करी हे सतीचे ।'
सावरकरांची धाडसी कल्पना सौम्य बनून, बारीक बारीक कलाकुसरही मोठ्या खुबीने करते आणि शब्दांचे आणि अर्थांचे अलंकार घडविते. तानाजींच्या सिंहगडावरील समाधीसंबंधी सावरकर म्हणतात.
'मग त्या गडची भूमी ठेवी तानाजीस उदरी ।
तेव्हापासून रत्नाकर बहु तिचा द्वेष करी ।। सावरकरांची कविता प्रतिभेचा कल्पनाविलास नसून, त्यांचे जीवनच एक उत्तुंग काव्य आहे. पराक्रमाच्या- धाडसांच्या अनेक रोमांचक क्षणांतून त्यांचे जीवन दुःख आणि यातनांच्या महासागराने भरलेले असतानाही, त्यांचे कविमन सुख-दु:खांच्याही पलीकडे जाऊन, 'कमला'सारख्या काव्यात रममाण होते. जगन्नाथाच्या रथाचे, रवींद्रनाथांच्या पुरस्काराचे सहर्ष स्वागत करत, आकांक्षांनी फुलून जाते. ही महानता अवर्णनीय, चिरस्मरणीय आणि वंदनीय आहे. अशा थार मातृभक्ताला मातृभूच्या स्वातंत्र्यदिनी माझे कोटी कोटी प्रणाम!
जय हिंद!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.