KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

भाषणे शाळेतील मुलांसाठी भाग - 32(अंधश्रद्धा : एक सामाजिक कलंक)


  अंधश्रद्धा : एक सामाजिक कलंक 

    माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, असे म्हणतात की, जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्माला सुरुवात होते, मी त्याच्याही पुढे जाऊन असे म्हणेन की, जिथे अध्यात्म संपते व श्रद्धेचा शेवट होते तिथेच अंधश्रद्धेला सुरुवात होते.
        आजच्या परिस्थितीत अंधश्रद्धा हा भारतीय समाजमनाला लागलेला फार मोठा कलंक आहे, असे म्हणणे निश्चितच उचित असेल. प्राचीन काळी निसर्गाची पूजा करणारा मान हळूहळू मंदिरातील दगडी मूर्तीची पूजा करू लागला. नैवेद्याची संकल्पना भोळ्या माणसांच्या श्रद्धेला कोंबड्या, बकऱ्याच्या बळीपर्यंत घेऊन गेली. दारिद्र्याने पिचलेल्या माणसांना महागड्या वैद्यापेक्षा अंगारा देणारा बाबा सोयीस्कर वाटू लागला. अशा प्रकारे रूढी, परंपरा, अज्ञान, दारिद्र्य अशा अनेक कारणांमुळे समाजातील खतपाणी मिळाले.
       एक छोटीशी वाळवी पाहता-पाहता संपूर्ण लाकूड पोखरून काढते. त्याचप्रमाणे समाजाला लागलेल्या अंधश्रद्धारूपी वाळवीने समाज पोखरण्यास सुरुवात केली आहे. अंधश्रद्धेच्या या एका छोट्याशा रोपट्याचा आता मोठा वटवृक्ष तयार झाला आहे. आणि याच वृक्षाच्या गर्द छायेखाली अनेक भोंदू बुवा अनेक देवांसह आपले दुकान टाकून बसले आहेत. कुणाचा गणपती दूध पिऊ लागला आहे. 
       कुणी बाबा कानाला हात लावून देवाला फोन लावत आहे.रूढी परंपरांना छेद देणाऱ्या छ. शाहूंच्या कोल्हापरमध्ये देवीची मूर्ती आणि गुप्त धनासाठी प्रचंड उत्खनन होत आहे. देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी कोबड्या-बकऱ्यांचे बळी दिले जातात, रक्ताचा सडा पडतो. मांसाचा चिखल होतो. यातच आणखीन भर म्हणजे काही ठिकाणी नरबळीही दिला जातो. 
      माणूसकीला काळीमा फासतील असे प्रकार अंधश्रद्धेतून होत आहेत. एकविसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जयजयकार करणारी माणसे दुसरीकडे मात्र अंधश्रद्धेला बळी पडतात. आमचा समाज जर अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला असेल तर २०२० साली महासत्ता बनण्याचे भारताचे स्वप्न हे स्वप्रच राहील. म्हणून भारतीय समाजाला लागलेला अंधश्रद्धेचा कलंक धुऊन काढणे गरजेचे आहे. कारण, याच अंधश्रद्धेमुळे अमानी माणूस आणखीच अज्ञानी बनत आहे.
         दारिद्र्याने बेजार झालेला गरीब अंधश्रद्धेच्या वणव्यामध्ये होरपळून निघत आहे. अंधश्रद्धेतून घडणाऱ्या गलिच्छ व अस्वच्छ प्रकारांमुळे वैयक्तिक व सामाजिक अनारोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सर्वप्रथम समाजातील अज्ञान नाहिसे केले पाहिजे. शिक्षणाचा सर्वत्र प्रसार झाला पाहिजे. जुन्या रूढी नष्ट केल्या पाहिजेत. त्यासाठी फुले, कर्वे, आगरकरांच्या विचारांची देशाला गरज आहे. कबिरांचे दोहे पुन्हा समाजाला सांगायला हवेत. 
      संतांनी दिलेले मानवतेचे संदेश लोकांच्या मनामध्ये रुजले पाहिजेत. संत गाडगेबाबंनी दिलेले विचार समाजाच्या कृतीतून प्रवाहित झाले पाहिजेत.
     ग्रामस्वच्छता अभियानाद्वारे केवळ गावातील घाण साफ करून भागणार नाही, तर गावातील माणसांच्या मनाला लागलेली अंधश्रद्धेची घाणही स्वच्छ करायला हवी, तरच अभियान सफल होईल अन् समाजाच्या मनातील अंधश्रद्धेची घाण दूर जाईल. 
जय हिंद!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking