KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

भाषणे शाळेतील मुलांसाठी भाग - 29 (प्रदूषण : एक समस्या)

 

 प्रदूषण : एक समस्या

          माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जग प्रचंड वेगाने प्रगती करत आहे. विकासाच्या या स्पर्धेबरोबर धावताना धावणं होत आहे पण योग्य ठिकाणी पोहोचणं तसंच राहून जातंय. कारण बदलाच्या या युगात जेवढी प्रगती झाली तेवढ्या समस्याही निर्माण झाल्या आहेत. 
       त्यातीलच मानवी जीवनाच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक समस्या म्हणजे 'वाढते प्रदूषण "भारताबरोबरच संपूर्ण जगासमोर प्रदूषणाचा हा बागुलबुवा आ वासून उभा आहे. सामान्य खेड्यापासू महाकाय शहरापर्यंत सर्वत्रच हे प्रदूषणाचे वारे वाहत आहेत. सर्वसाधारणपणे वायूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण हे प्रदूषणाचे प्रमुख प्रकार मानले जातात. औद्योगिक क्रांतीनंतर कारखानदारी वाढली. 
     कारखान्यांची धुराडी आकाशात धूर ओकू लागली, गतिमान जीवनाने वाहनांची संख्या वाढवली. यामुळे जीवनात सहजता आली असेल पण वाढलेल्या वायूप्रदूषणाने जगणे मात्र असाहाय्य झाले. श्वसनाचे विकार उदभवू लागले. शुद्ध हवा मिळेनाशी झाली. 
     पाण्याला जीवन मानले जाते पण हेच पाणी प्रदूषित होत असल्याने जीवधेणी परिस्थिती निर्माण झाली आहे. गावातल्या सांडपाण्याने, कारखान्यातील सांडपाण्याने, नद्यांना गटारगंगेचे स्वरूप प्राप्त होत आहे. 
      पाण्याच्या वापराच्या पारंपरिक पद्धतीमुळे गावतळी व पाणवठे गढूळ बनत आहत. साथीचे आजार अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. जलचरांचे प्रमाण कमी होत आहे. शुद्ध पाण्याला दुधाहून जास्त भाव आहे.
      पाण्यावरून युद्ध होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रत्येक गोष्टीचा अतिरेक हा विनाशाकडे नेणारा असतो. मानवाने केलेल्या प्रगतीबाबतही हेच घडत आहे. वैयक्तिक, सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने लावले जाणारे स्पिकर, डॉल्बी, वाहनांचे आवाज, कर्कश्श हॉर्न यांसारखे अनेक घटक ध्वनिप्रदूषण करत आहेत. त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत आहे. 
     त्याचबरोबर कानाचे आजार बहिरेपणा येणे यांसारखे विकार निर्माण होत आहेत. मोठ्या शहरांमध्ये वापरून टाकलेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट लावणे हे एक आव्हान ठरत आहे. रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अवाजवी वापर यामुळेमातीची सुपीकता कमी होत आहे. या नवीन समस्यासुद्धा प्रदूषणाचाच एक भाग बनला आहेत. 
    अशा प्रकारे वाढत्या प्रदूषणामुळे मानवाबरोबरच संपूर्ण सजीव सृष्टीला विघातक परिणामांना सामोरे जावे लागत आहे.  पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींचा धोका निर्माण होत आहे. जागतिक तापमानवाढ हा देखील प्रदूषणाचा भयावह परिणाम आहे. 
    अशी प्रदूषित परिस्थिती निर्माण होण्याला बऱ्याच अंशी मानवाचे चुकीचे वर्तनच कारणीभूत आहे. आता हे प्रदूषण कमी करण्यासाठी मानवाचे योग्य वर्तनच कारणीभूत ठरणार आहे. वनांची प्रचंड तोड करणाऱ्या मानवाने वृक्षलागवड व संवर्धन आपले कर्तव्य मानले पाहिजे. जैविक इंधन निर्मिती व वापर टाळला पाहिजे. कारखान्यातील सांडपाण्यातील रासायनिक घटक बाजूला काढून नंतरच ते पाणी बाहेर सोडणे योग्य होईल. 
     पाण्याचा अतिवापर टाळायला हवा. प्लॅस्टिक बंदीचे सक्तीने पालन केले पाहिजे. शेतीमध्ये सेंद्रिय खते व औषधांचा वापर अपरिहार्य आहे. वाहनांच्या कर्कश्श हॉर्नवर बंदी असली पाहिजे. आपल्या मनोरंजनामुळे इतरांच्या मनाला त्रास होणार नाही हा विचार प्रत्येकाने करायला हवा. एकूणच मानवाचे मत परिवर्तन, विचार परिवर्तन होणे गरजेचे आहे.             त्यासाठी शासन-प्रशासन, स्वयंसेवी संस्था, प्रसारमाध्यमे, शाळा- महाविद्यालये, पर्यावरण विषयक संस्था कार्य करतच आहेत. फक्त या घटकांनी आपल्या कार्याची गती आणि व्यापकता वाढवावी आणि त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने त्यांना मदत करणे गरजेचे आहे. तरच आपण हे वाढत्या प्रदूषणाचे आव्हान समर्थपणे पेलू शकतो. 
जय हिंद!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking