माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, दोन अमेरिकन एकमेकांना भेटले तर ते अमेरिकेच्या प्रगतीविषयी चर्चा करतील. दोन जपानी भेटले तर ते जपानने मार्केटमध्ये आणलेल्या नवीन वस्तूंविषयी बोलतील. पण दोन भारतीय भेटले तर ते आधी एकमेकांना आपली जात विचारतील. सुशिक्षित वगैरे असतील, तर ते बोलता बोलता गप्पांमधून अप्रत्यक्षपणे जात जाणून घेतील.
आपल्याकडे एखाद्या व्यक्तीनं चांगली कामगिरी केली, कुठे साहित्यात व्यवसायात, खेळात, शिक्षणात किंवा कुठल्याही क्षेत्रात उज्ज्वल यश मिळविलं, तर लोक तिच्याशी बोलताना "अरे वा, अभिनंदन! फार छान वाटलं!" वरगैरे वगैरे बोलतील. पुढे त्या व्यक्तीच्या यशाची कमान वाढतच चालली, तर मात्र अवस्थ होऊन पाठीमागे चर्चा करतील. ऐकणारी व्यक्ती आपल्यापैकीच आहे याची खात्री असेल तर, मग पुढच्या पायऱ्या हा अमुक म्हणजे अमुक अमुक जातीचा असावा नाही? आणि या अमुकबद्दल दोन्ही बाजूने मुक्ताफळे पडतील.
आपण राहतो त्या वस्तीत, नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यापारी वर्गात लोकांची नकळत वर्तुळं बनतात. त्यांची समान जात हाच वर्तुळाचा बहुधा केंद्र असतो. या वर्तुळात खुलेपणाने चर्चा चालतात. एकजातीय गटातील लोक दुसऱ्या गटातील लोकांचे जमेल तेव्हा पाय ओढण्याची संधी सोडत नाहीत. आपल्या गटातील लोकांचा उदो उदो करणे, सवलतींचा जास्तीत जास्त फायदा आपल्या गटातील लोकांच्याच पदरी पडेल हे पाहत राहणे, असे प्रत्येक गटात चालते, मग कधी है गट त्या गटावर कुरघोडी करतो, तर कधी हा गट त्या गटाला नामोहगम ही सगळे केले जाते ते साळसूदपणे आणि नियमांच्या चौकटीत राहून. हे चित्र मोठया शहरांतील सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या लोकांमध्ये सर्वत्र आढळते.
ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांमध्ये जातीचे स्वरूप भयंकर आणि घृणास्पद आहे. तिथे जातवाल्या लोकांचाच फार त्रास असतो. जातीच्या संकेतांच्या आणि लोकांच्या मर्जीविरूद्ध जाणाऱ्या प्रगाड पंडितालाही जातीवाले हाय हाय करायला लावतात. शरणकुमार लिंबाळेचे 'अक्करमाशी', लक्ष्मण मानेंची 'उपरा ही आत्मचरित्रे आपल्यापैकी बहुतेकांना माहीत असतीलच. लक्ष्मण माने तळागाळातल्या भटक्या जमातीतले. या जमातीचा मुक्काम गावाच्या हागणदारीजवळ असे. मुले गाढवं चारीत. आईवडील पांदीच्या फोकापासून दुरड्या, शिप्तरं बनवून ती गावकऱ्यांना नेऊन देत. त्यांना त्याच्या मोबदल्यात गावातून उरलंसुरलं खरकटं मिळत असे. कधी कधी आई भीक मागायलाही जाई. (मुक्कामी असताना गावात कधी कुठे चोरीचपाटी झाली तर पोलीस आधी या गावाबाहेरच्या कैकाड्यांना शोधून काढीत. घरातील बायका- -पुरुषांना फरपटत ओढून नेत. चार-चार दिवस तुरुंगात डांबून ठेवत त्यांचा अनन्वित छळ करत. या छळातून तयंची तान्ही मुलंसुद्धा सुटत नसत). अशा जमातीतून पुढे आलेले, मोठे झालेले लक्ष्मण माने. सरकारने आरि साहित्यिकांनी ज्यांस पुरस्कार दिला, ज्यांचा गौरव केला, ते प्रत्यक्षात आपल्या जातीपुढे असहाय, हतबल होतात. जातीबाहेरच्या मुलीशी लग्न केले म्हणून जातपंचायतीनं त्यांच्या आईबापांना वाळीत टाकलं. जातीतून वाळीत टाकणं ही भयंकर शिक्षा आहे. यात मानवा विष्ठा खायला लावरं वगैरे किळसवाण्या शिक्षेचे प्रकार आजही चालतात. जातीबाहेर काढलेल्या कुटुंबातील मुलामुलींशी कुणी लग्न करत नाही. मुक्कामात जवळपास झोपटी टाकू देत नाहीत. पोलिसांनी पकडून नेले तर मुलाबाळांकडे कोणी बघत नाही. आपल्या गरीब आईबापांचा छळ थांबविण्यासाठी लक्ष्मण माने यांना आपल्या परजातीच्या बायकोला जातपंचायतीकडून आधी जातीची करून घ्यावी लागली. जात पंचायतीकडून दुसऱ्यांदा त्याच बायकोशी लग्न लावून घ्यावे लागले आणि मागेपुढे त्यांच्या आईवडिलांचा छळ थांबला. उच्चवर्णीय समजल्या जाणाऱ्या जातीमध्येसुद्धा पुरातन काळी असंच चित्र होतं. ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांना जातीने वाळीतच टाकलं होतं. आपल्या मुलांचे कस होईल या दुःखाने व्यथित होऊन, त्यांनी म्हणजे त्या उभयतांनी नदीत बुडून जीव दिला. त्यांची कोवळ्या वयातील चार अजाण बालकं अनाथ, अनवाणी, दीनवाणी होऊन आपेगाव ते पैठण भटकत राहिली. आपल्या सामाजिक अस्तित्वासाठी त्यांनी शास्त्री-पंडितांच्या विनवण्या केल्या. पुढे ज्ञानेश्वर अलौकिक मोठे झाले. 'ज्ञानियाचा राजा' म्हणून ओळखले जाऊ लागले, पण समाजातील जातींच्या तटबंदी अभेद्यच राहिल्या.
आज आपल्या देशात चार वर्णांच्या एकूण ४,० ०० जाती आहेत. जातीचा उगम स्मृतिकालीन कालखंडात झालेला दिसतो. वैदिककाळी वर्णव्यवस्था कर्मावर आधारित होती. समाजाची कामं लोक आपापल्या कुवतीप्रमाणे आणि आवडीप्रमाणे करत असत. प्रारंभी वर्णव्यवस्था ही कर्मावर आधारित असली, तरी पुढे कर्मापेक्षा जन्मावरूनच वर्ण ठरत असे. या चार वर्णाच्या ४,००० जाती झाल्या, त्या लोकांच्या व्यवसायांवरून.
चांभार, सुतार, सोनार, कुंभार, धोबी, शिंपी अशा जातींमध्येसुद्धा पुन्हा नामदेव शिंपी, गाडी लोहार, लेवा पाटील अशा प्रकारच्या पोटजाती झाल्या आणि त्या जातींभोवती तटबंदी आल्या. दुर्दैव असे, की आपल्या शासनाला जातीजमातींमधील भेदाभेद नष्ट करायचा असल्यामुळे सवलती देण्यासाठीसुद्धा जातीचाच आधार घ्यावा लागतोय. आपल्याकडे धर्म, जात, संस्कृती यांमध्ये फार मोठी गल्लत होताना दिसते. धर्म म्हणजे कल्पित असूनही, वास्तव मानल्या जाणाऱ्या विशिष्ट अशा अतिमानवी शक्तीला अनुकूल करून घेण्यासाठी मानवाने निर्माण केलेली उपासना पद्धती म्हणजे धर्म, एका धर्मात अनेक जाती अंतर्भूत असलेल्या दिसतात.
संस्कृती ही परिसर आणि परिस्थितीशी निगडीत असते. कित्येक वेळा दोन भिन्न धर्मीयांची संस्कृती एकच असते. जगाच्या पाठीवर कुठेही जा सर्वत्र सारखेच आहे. राग, लोभ, आनंद, दु:ख या भावनांची अभिव्यक्ती सर्वत्र सारखीच आहे. दुःखाची, आनंदाची प्रेमाची कारणं व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकतात, पण माणसाने व्यक्त केलेली भावना ही सर्वत्र सारखीच असते. म्हणून अखिल मानव जातीची सर्वत्र सारखीच संस्कृती असते.
'मानवजात' या शब्दात मानव हीच एक जात आहे. ती आपण पाळतो आणि मानतो, त्या जाती मुळात जाती नाहीतच. जीवशास्त्राप्रमाणे गोरिला ही एक जात, चिम्पँझी ही वेगळी जात; वानर, माकड, अस्वल, घोडा, बैल या जशा प्राण्यांच्या जाती आहेत तशीच मानव हीपण एक जात आहे. प्राणिशास्त्रात समान गुणधर्म असलेल्या प्राण्यांचे वर्ग आहेत. सस्तन प्राणिवर्गात होमोसॅपियन ही मानवाची जात येते. जगातल्या कुठल्याही भिन्न जाती, धर्म, वंश असलेल्या दोन वेगवेगळ्या माणसांच्या पेशीतील गुणसुत्रांची संख्या तपासून पाहिली तर ती ४६ असेल. योगायोगाने माणसाच्या आणि गाढवांच्या पेशींमध्ये सारखीच गुणसुत्रे आढळतात हा भाग वेगळा.
आपण मानतो, त्या जातींना शास्त्रात म्हणजेच विज्ञानात कुठेही स्थान नाही. म्हणून माझ्या मते धर्मशास्रातसुद्धा अशा जातींना स्थान नसावे. विज्ञान हाच आजचा धर्म आपण मानतो. आपल्या विज्ञानात आपण मानतो, त्या धर्माला स्थान नाही आणि म्हणून धर्मामध्ये असलेल्या जातींनाही स्थान नाही. तरीही या जाती आपल्याला जळूसारख्या चिकटून आहेत. याला कारण म्हणजे ज्या गतीने वैज्ञानिक प्रगती झाली, त्या गतीने सामाजिक प्रगती होत नाही. सामाजिक स्थित्यंतर ही अतिशय मंद प्रक्रिया आहे. हळूहळू समाजात परिवर्तन हेत आहे. म्हणून शेवटी म्हणूया- हळूहळू जाते ती जात!
जय हिंद!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.