शिक्षण महर्षी : कर्मवीर भाऊराव पाटील
माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, दीन-दलितांच्यासाठी ज्ञानदीप लावीला पंखफुट्या पाखरांसाठी वटवृक्ष रोवीला । महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात अज्ञानाचा अंध:कार पसरलेला होता. दीन-दलित बहुजन समाज अज्ञानाच्या खोल गर्तेत रुतत चालला होता.
अशा या समाजाला ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी एक तेजस्वी ज्ञानसूर्य महाराष्ट्राच्या क्षितिजावर उगवला. त्या ज्ञानसूर्याचे नाव होते कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर अण्णांचा जन्म २२ सप्टेंबर, १८८७ रोजी निसर्गरम्य कुंभोज या गावी झाला व तेथेच त्यांचे बालपण हळूहळू हरवू लागले. कुंभोज गावी जन्मलेला हा बाळ पुढे ज्ञानाचे कुंभ घेऊन सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात फिरू लागला.
त्याच्या कार्याने सारा महाराष्ट्र दिपून गेला. लहानपणी एकदा त्यांच्या अस्पृश्य मित्रांना विहिरीवर पिण्यासाठी पाणी दिले नाही म्हणून भाऊरावांनी त्या विहिरीवरील पाणी ओढण्याचा रहाट विहिरीत ढकलून दिला. आणि येथूनच त्यांच्या समाजक्रांतीच्या कार्याला सुरुवात झाली. छ. शाहू, फुले व आंबेडकर या त्रिसुत्रीतूनच भाऊरावांच्या मनामध्ये समाजसेवेचे बिजारोपण झाले.
दुधगाव येथे 'दुधगाव विद्यार्थी शिक्षण संस्था' ही छोटीशी संस्था काढून त्यांनी आपल्या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. १९१९ साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून अस्पृश्यांसाठी बंद असलेली ज्ञानाची कवाडे खुली केली. त्यांनी सुरू केलेल्या शालेत, वसतिगृहात सर्व जाती-जमातीच्या मुलांना प्रवेश होता.
यातूनच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये समतेचा धडा रुजवण्याचं काम अण्णांनी केलं. एकदा एक व्यक्ती अण्णांकडे आली व म्हणाली, 'तुम्ही मागाल तेवढे पैसे मी तुम्हाला देतो फक्त तुम्ही साताऱ्याच्या शिवाजी कॉलेजचे नाव बदलून त्या कॉलेजला माझे नाव द्या.' त्या इसमाला अण्णांनी सडेतोड उत्तर दिले. "एकवेळ मी माझ्या बापाचे नाव बदलीन पण या कॉलेजला दिलेले छत्रपतींचे नाव बदलणार नाही." यावरून अण्णांची तत्त्वनिष्ठा आपल्या लक्षात येते.
भाऊरावांनी माणसातील अस्मिता जागी केली, अज्ञान हेच बहुजनांच्या झोपडीतील दारिद्र्याचे कारण आहे हे ओळखून त्यांनी शैक्षणिक सुधारणांवर भर दिला. अठरापगह जातीच्या मुलांना एकत्र आणून ज्ञानाची बाग फुलवली. कर्मवीरांनी साताऱ्यात लावलेल्या वटवृक्षाचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर पसरविला.
कर्मवीर अण्णा केवळ शिक्षण महर्षीच नव्हते, तर ते एक थोर गुरू होते. बॅरिस्टर पी.जी. पाटील, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांसारख्या हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम अण्णांनी केले. माधुकरी मागून खाणे व शिक्षण घेणे त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी स्वावलंबी शिक्षणाचा मूलमंत्र आपल्या विद्यार्थ्यांना दिला.
समाजसेवा करताना स्वत:च्या संसाराची तमा त्यांनी कधीच बाळगली नाही. अज्ञानरुपी गर्तेत रुतत चाललेल्या बहुजन समाजाला ज्ञानगंगेच्या तीरावर आणण्यासाठी आपल्या आयुष्याची गंगा त्यांनी खर्च केली. अशा या महान तपस्वी शिक्षण महर्षीना आणि त्यांच्या दिव्य कार्यकर्तृत्वाला शतशः प्रणाम!
जय हिंद!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.