श्री छत्रपती शाहू महाराज
माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो. गोरगरिबांच्या झोपडीमध्ये ज्ञानाचा दिवा पेटावा म्हणून आयुष्यभर एका दिव्याप्रमाणे तेवत राहणारा एक नंदादीप, अठरापगड जातीच्या माणसांना एकाच पंक्तीला बसवून जेवू घालणारा महामानव रंजल्यागांजल्यांच्या शिरावर मायेचं छत्र उभं करणारा एकमेव छत्रपती, कोल्हापूर संस्थानातील रयत, त्या रयतेतील माणसं, त्या माणसांची मनं आणि मनावर अधिराज्य गाजवणारा रयतराजा म्हणजे लोकराजा शाहू महाराज होय.
मानसशास्त्र सांगते व्यक्तीमध्ये गुण हे अनुवंशाने येतात. इतिहासामध्ये बऱ्याच वेळा राजाचाच मुलगा राजा होतो पण याला काही असामान्य अपवाद असतात हे इतिहासाने मान्य कैले आहे. सतराव्या शतकात, वयाच्या १६ व्या वर्षी हातात तलवार घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी हे शहाजी भोसले या सरदाराचे सुपुत्र होते आणि १९ व्या शतकामध्ये कोल्हापूर संस्थानात रयतेचे राज्य निर्माण करणारे छ. शाहू हे जयसिंगराव घाटगे या सरदाराचे सुपुत्र होते.
राजा हा जन्माला येत नाही तर तो आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक मिळवतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय. "झाले बहू, होतील बहू! आहेतही बहू, परि यासम हा " वयाच्या २० व्या वर्षी सत्ता, संपत्ती, वैभव हाती आलेलं असताना त्या मोहपाशात गुंतून न राहता जनतेच्या कल्याणाची काळजी करणारा राजा भेटला हे खऱ्या अर्थाने कोल्हापूरच्या मातीचे सद्भाग्यच समजावे लागेल. हातात आलेला राजदंड वापरून शाहू महाराजांनी सर्वप्रथम वर्णभेदाची उतरंड उद्ध्वस्त केली.
या भूमीवर संतांनीउभी केलेली समतेची पताका शाहूंनी स्वत:च्या खांद्यावर पेलली. अस्पृश्यता, जातीय विषमता याविरुद्ध शाहूंनी रणशिंग फुंकले, परिणामी बहुजन समाज जागा झाला. कोल्हापूरमध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करण्याचे कार्य छत्रपती शाहूंनी केले. सार्वजनिक नळ आणि खानावळी दलितांसाठी खुल्या केल्या.
स्त्रियांच्या कल्याणासाठी विधवा पुनर्विवाह, बालविवाह प्रतिबंधक व घटस्फोट विरोधी कायदे छ. शाहूंनी केले. तसेच सहकारी नियोजनाचा कायदा व सहकारी सोसायट्यांची निर्मिती केली. शेतकऱ्यांची दुष्काळाच्या दाढेतून सुटका व्हावी म्हणून राधानगरी धरणं बांधले.
या सगळ्या सुधारणांचा विचार केला तर शाहू महाराजांच्या रुपाने कोल्हापूरला परिवर्तनाच्या वाटेने नेणारा प्रवासी भेटला असेल म्हणावे लागेल. शाहू महाराजांनी आंबेडकरांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत केली एवढंच नाही तर कर्मवीर भाऊरावांच्या मनात शिक्षण प्रसाराची बिजे शाहू महाराजांच्या सहवासातूनच पेरली गेली.
म. फुलेंनी सावित्रीबाईंना शिक्षण दिले. त्याचप्रमाणे शाहू महाराजांनी आपल्या विधवा सुनेला इंदुमतीला प्रथम साक्षर केले आणि नंतर स्री शिक्षणास सुरुवात केली. स्वातंत्र्यानंतर सरकारने घटनेनुसार अस्पृश्यांसाठी नोकरीमध्ये राखीव जागा ठेवण्याची तरतूद केली. हीच तरतूद शाहूंनी स्वातंत्र्यापूर्वी आपल्या राज्यात लागू केली होती. १९१७ साली शाहूंनी कोल्हापुरात सक्तीचे व मोफत शिक्षण सुरू केले होते. यावरून छत्रपती शाहूंच्या प्रदीर्घ दूरदृष्टीची आणि आधुनिकतेची कल्पना येते. अशा प्रकारे शाहू महाराज हे महाराष्ट्रात पुरोगामी विचारसरणीचा पाया घालणारे विचारवंत होते. परिवर्तनाची सुरुवात स्वत: पासून करणारे कृतिवंत होते.
महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीचे अग्रदूत होते. शाहू महाराजांच्या रुपाने महान राजातला माणूस आणि माणसांचा महान राजा कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळाला आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला द्रष्टा समाजसुधारक पाहायला मिळाला.
अठरापगड जातीच्या माणसांना आपल्या अंगा-खांद्यावर घेऊन परिवर्तनाच्या वाटेने विकास साध्य करत चाललेले छ. शाहू पाहिले की, संत मेळ्यासह उभ्या असलेल्या लेकुरवाळ्या विठ्ठलाची आठवण होते आणि ओठांतून शब्द बाहेर येतात. धन्य धन्य तू शाहूराया,
जय हिंद!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.