KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

भाषणे शाळेतील मुलांसाठी भाग - 5 (राजीव गांधी)

राजीव गांधी 
             माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, म. गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंनी प्रजासत्ताक गणराज्य स्थापून देशाला प्रगतीच्या वाटेवर आणून सोडले. त्यांच्यानंतर हे कार्य इंदिरा गांधी यांनी समर्थपणे स्वत:च्या खांद्यावर पेलले. 
           इंदिराजींच्या मृत्यूनंतर त्यांचे सुपुत्र राजीव गांधी यांनी राष्ट्रविकासाचे हे स्वप्न उराशी बाळगून देशाला खऱ्या अर्थाने २१ व्या शतकाच्या उंबरठ्यापर्यंत जाण्याइतपत सबळ व सक्षम केले. २० ऑगस्ट १९४४ रोजी मुंबई येथे राजीव गांधी यांचा जन्म झाला. घरातील स्वातंत्र्यलढ्याचे, राजकारणाचे वातावरण राजीव गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी पोषक ठरले. 
        लंडनमध्ये उच्च शिक्षणपूर्ण केल्यानंतर त्यांनी हैद्राबाद येथे विमान पायलटचे ट्रेनिंग घेतले. विमान चालवण्यात त्यांना अधिक रस होता. बंधू संजय गांधींच्या निधनानंतर काँग्रेसचे महासचिवपद राजीव गांधीनी स्वीकारावे असे अनेक काँग्रेस सदस्यांचे मत होते.त्यांना राजकारणात आवड नसल्याने शेवटी इंदिराजींना मदत करण्याच्या उद्देशाने मे १९८१ मध्ये त्यांनी काँग्रेसचे अधिकृत सदस्यत्व स्वीकारले. जून १९८९ च्या निवडणूकीत ते लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले. 
        लोकांना त्यांच्या तत्पर व उमद्या नेतृत्वाची, जाणीव झाली आणि येथूनच युवकांचे प्रेरणास्थान ठरलेल्या या नेतृत्वाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. संसद सदस्य म्हणून शेतकरी, युवक, पर्यावरण संतुलन, गंगा शुद्धीकरण शैक्षणिक सुधारणा यासारख्या धटकांचा अभ्यास करत त्यांनी स्वत:ला पूर्णपणे राजकारणात झोकून दिले. 
         इंदिराजींच्या दुर्दैवी मृत्यूनंतर देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा राजीव गांधींनी समर्थपणे पेलली. इंदिराजींच्या मृत्यूनंतर देशात निर्माण झालेली दंगल शमवून प्रतिकूल परिस्थितीतून देशाला योग्य दिशा देण्याचे काम अवघ्या चाळीस वर्षाच्या या युवा नेत्याने केले. "२१ व्या शतकात प्रवेश करणाच्या सक्षम भारताची बांधणी करण्यासाठी सर्व भारतीयांनी सहकार्य करावे."असे आवाहन केले.
        राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवून धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार साऱ्या भारतीयांनी करावा असा त्यांचा आग्रह होता. देशातील दारिद्र्य दूर करून गरिबांचा विकास करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शिक्षण, आरोग्य  यासारख्या मुलभूत सुविधांना त्यांनी विकास आराखड्यात अग्रक्रम दिला. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देऊन जगामध्ये भारताची मान उंचावली. 
          १९८५ मध्ये बांगलादेशात झालेल्या वादळानंतर वादळग्रस्तांना भेट देण्यासाठी राजीव गांधी बांगलादेशात गेले होते. तसेच श्रीलंकेतील तामिळ लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी लंकेलाही भेट दिली. सर्व जगात शांतता प्रस्थापित व्हावी व संपूर्ण जग एक कुटुंब व्हावं अशी त्यांची भावना होती. उत्तमसंघटन कौशल्य, समस्या सोडविण्यात हातखंडा, नाविन्यपूर्ण विचार, तत्पर कृती, जबाबदारीची जाणीव, कर्तव्याची कास यासारखे अनेक गुण या चैतन्यशील नेतृत्वाच्या ठायी होते. 
          २१ में १९९१ या दिवशी पेरांबुर (मद्रास) येथे होणाऱ्या प्रचारसभेसाठी राजीव गांधी गेले होते. सभेसाठी व्यासपीठावर जाण्यापूर्वीच झालेल्या बॉम्बस्फोटात राजीवजींचा दुर्दैवी मृत्यू झाला. भारताच्या राजकीय क्षितीजावर कर्तृत्वाच्या देदीप्यमान प्रकाशाने तळपणारा तेजस्वी तारा अनंतात विलीन झाला. अत्यल्प काळामध्येसुद्धा या देशाला अनोखा प्रकाश व आगळी-वेगळी दिशा देऊन गेला. 
           जय हिंद!


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking