डॉ. बाबासाहेब आंबेडकर
माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, शोषितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा, उपेक्षितांच्या अंधारमय जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटविणारा प्रकाशसूर्य, स्वत:च्या विद्वत्तेचा उपयोग समाजाच्या हितासाठी करणारा विद्वान, समाजसुधारक आणि स्वतंत्र भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणजेच शोषितांचे मुक्तिदाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. आंबेडकरांचे शालेय शिक्षण रत्नागिरी, सातारा, मुंबई येथे झाले. त्यांनी आपले उच्च शिक्षण परदेशात पूर्ण केले. त्यानंतर हिंदुस्थानातील त्यांच्या व्यावसायिक व शैक्षणिक जीवनात त्यांची सर्वांकडून 'अस्पृश्य' म्हणून मानहानी झाली आणि तेथूनच त्यांनी 'अस्पृश्योद्धार' हे आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय ठरविले. समाजसुधारक महात्मा फुले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आदर्श मानले.
लोकहितवादीसारख्या समाजधुरिणांनी सुरू केलेली समाजसुधारणेची चळवळ भारतातल्या शोषितांच्या वस्तीपर्यंत नेण्याचे महान काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा संदेश त्यांनी आपल्या बांधवांना दिला आणि त्यातून दलितोद्वाराला प्रारंभ झाला. अस्पृश्यतेचे समर्थन करणाऱ्या आणि दलितांच्या कपाळी गुलामगिरीचा शिक्का मारणाऱ्या मनुस्मृती चे दहन केले. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी सत्याग्रह केला.
महाडच्या चवदार तळ्यावर दलितांना। पाणी भरण्याचा हक्क मिळावा म्हणून डॉ. आंबेडकरांनी सत्याग्रह केला. समाजाने । धिक्कारलेल्या गावकुसाबाहेरच्या जगण्याला माणूसपण देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. 'मूकनायक' व 'बहिष्कृत भारत' यांसारखी वृत्तपत्रे सुरू केली. त्यांच्या माध्यमातून आपले विचार सामान्य माणसांपर्यंत पोहोचवून समाजामध्ये जागृती करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले.
अशा प्रकारे वर्षानुवर्षांच्या गुलामगिरीतून शोषित समाजाची मुक्तता करण्याचे काम त्यांनी केले. स्वत:च्या असामान्य कर्तृत्वाने काळाच्या वाटेवर तेजाची दमदार पावले उमटविणारा हा तपस्वी ६ डिसेंबर १९५६ रोजी काळाच्या पडद्याआड गेला.
जय हिंद!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.