KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

भाषणे शाळेतील मुलांसाठी भाग - 1 (राष्ट्रपिता महात्मा गांधी)

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी 


          माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, 'रणाविन स्वातंत्र्य कोणा मिळाले?' असे एका कवीने म्हटले आहे. 

         भारताच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या लढ्यामध्ये रणाशिवाय विनयशील मार्गाने झालेला एक लढा अग्रगण्य ठिकाणी होता. तो लढा होता 'अहिंसा व सत्याग्रहाचा' आणि त्या लढ्याचे नेते होते राष्ट्रपिता महात्मा गांधी. महात्मा गांधी हे एकअलौकिक व्यक्तिमत्त्व होते. 

           त्यांचे सारे जीवनच प्रार्थनेप्रमाणे मंगल आणि पवित्र होते. सत्य व अहिंसा हा त्यांच्या जीवनाचा पाया होता. असीम त्यागाने भारलेल्या त्यांच्या जीवनाला तत्त्वाचे अधिष्ठान होते. सत्य हा गांधीजींच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. सत्याचे दुसरे नावच गांधीजी होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

           आफ्रिकेतील संघर्षापासून त्यांच्या सार्वजनिक जीवनकार्याला सुरूवात झाली. आफ्रिकेतील संघर्ष हा केवळ हक्कांसाठी दिलेला लढा नसून सापेक्ष सत्याच्या जतनासाठी त्यांनी केलेला हा पहिला सत्याग्रहच होता. परदेशातून ' भारतात आल्यावर गांधीजींनी आपल्या मातृभूमीची व्यथा पाहिली. 

           आपल्या देशबांधवांची परिस्थिती उघड्या डोळ्यांनी पाहिली. या मातृभूमीच्या मुक्तीसाठी आणि इथल्या रंजल्या गांजल्या माणसांसाठी स्वत:चं आयुष्य समर्पित करणे हेच आपले जीवितकार्य मानले.

           युरोपातून भारतात आल्यावर आपल्या अंगावरील वकिलीची पोषाख खाली उतरवून शिक्षणाची झापडं झटकून टाकून दिली आणि हा महान योद्धा समाजसेवेसाठी तयार झाला ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करण्यासाठी, परंतु या संघर्षासाठी कोणतेही शस्त्र हाती न घेता, त्यांनी अहिंसा व सत्याग्रह या मार्गाचा अवलंब केला. 

           बाडौंलीतील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रह केला. १९२० साली देशव्यापी असहकार आंदोलन उभे केले. आंदोलनाला हिंसक वळण लागताच ते आंदोलन थांबवणारा हा महामानव आयुष्यभर आपल्या तत्त्वांशी बांधील राहिला. 

           साबरमती ते दांडी हे अंतर पायी चालत जाऊन त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला. इ.स. १९४२ साली सुरू झालेल्या आंदोलनात त्यांनी 'करेंगे या मरेंगे' हा संदेश दिला. इंग्रजांना 'चलेजाव' असे ठणकावून सांगणाऱ्या गांधीजींनीच १९४२ चे आंदोलन तीव्र केले. 

           १५ ऑगस्ट १९४७ रोजी अनेक देशभक्तांच्या त्यागातून स्वातंत्र्याचं महान मंदिर उभं राहिलं. हे मंदिर उभे राहण्यामागे   गांधीजींच्यासारख्या महामानवाचा सिंहाचा वाटा आहे हे इतिहासाला कदापि नाकारता येणार नाही. 

          स्वातंत्र्यानंतर कोणतेही पद न स्वीकारता त्यांनी गरीब जनतेची निस्सीम सेवा केली आणि म्हणूनच ते खऱ्या अर्थाने ते देशाचे राष्ट्रपिता व महात्मा ठरले. 

जय हिंद!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking