माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, जनतेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हे देशभक्तांचे स्वप्न होते. स्वतंत्र भारत एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर प्रगत राष्ट्र म्हणून ओळखला जावा हे राजीव गांधींसारख्या उमद्या नेतृत्वाचं स्वप्न होतं. २०२० साली भारत महासत्ता होईल हे डॉ. अब्दुल कलामांचं स्वप्न आहे. देशाबद्दल या माणसांची जशी स्वप्ने होती, अगदी तसेच माझेही एक स्वप्न आहे.
माझ्या स्वप्रातील भारतामध्ये प्रत्येक मतदार हा आपल्या मतदानाच्या हक्काविषयी जागृत असेल. योग्य माणसाचीच लोकप्रतिनिधी म्हणून निवड केली जाईल. त्यामुळे अब्राहम लिंकनच्या व्याख्येतील लोकशाही खऱ्या अर्थाने माझ्या भारतामध्ये अस्तित्वात असेल. माझ्या भारतातील शेतकरी हा खऱ्या अर्थाने 'बळीराजा' असेल. शासन त्याला सर्वतोपरी सहाय्य करेल. शेतमालाला योग्य भाव मिळेल मग शेतकरी आत्महत्या करणार नाही. कामगार वर्ग सुखी असेल. गरीब, श्रीमंत अशी दरी असणार नाही. शैक्षणिक धोरणे नावीन्यपूर्ण असतील. सुजाण नागरिक घडविण्याचे काम शाळा, महाविद्यालयांमधून होईल. तरुण वर्ग बेकार असणार नाही. देशाची शक्ती असलेली ही युवाशक्ती व्यसनमुक्त व चारित्र्यसंपन्न असेल.
माझ्या देशातील प्रगतीचा आलेख उंचावलेला असेल. परंतु तो विकास करत असताना पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल. वृक्षतोड होणार नाही.
अभयारण्ये अबाधित राखली जातील. वनचरांचे अस्तित्व कायम असेल. अपारंपरिक ऊर्जेचा वापर अधिक प्रमाणात केला जाईल. खनिज साधनांना पर्याय उपलब्ध असतील. एकूणच माझा भारत 'इको फ्रेंडली' असेल.
प्रदूषणासारखी समस्या माझ्या भारतामध्ये नसेल. परिणामी सार्वजनिक आरोग्य उत्तम असेल. दहशतवादाची पाळेमुळे उपटून काढण्यासाठी तिथे प्रयत्न असेल. देशातील अंतर्गत सुरक्षितेबरोबरच बाह्य शत्रूंपासूनही माझा भारत देश सुरक्षित असेल.
एकूणच माझा भारत देश सधन, सुखी, संपन्न असेल. तेथील नागरिक समाधानी असतील. बंकिमचंद्र चटर्जी राष्ट्रीय गीतात म्हणतात, त्याप्रमाणे माझा भारत देश सुजलाम् सुफलाम् असेल. चला तर मित्रांनो, आपल्या भारत देशाविषयीचे माझे हे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सारे प्रयत्न करू या. आणि मग साऱ्या जगाला अभिमानाने सांगू या, 'सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्तां हमारा । हम बुलबुले है उसकी, यह गुलिस्ताँ हमारा ॥"
जय हिंद!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.