कर्मयोगी - बाबा आमटे
माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, दुःख आणि वेदनांचा अंधार अंगावर पांघरून जीवनाच्या प्रत्येक क्षणी मरणप्राय: यातना भोगणाऱ्या, कुष्ठरोग्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारे बाबा आमटे हे एक दीपस्तंभ होते. दुःख आणि दारिद्र्याने गांजलेल्या माणसांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी बाबांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले.
बाबांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे २६ डिसेंबर १९९४ रोजी जाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर उपेक्षित जीवन जगणाऱ्या माणसांसाठी त्यांनी कार्य करण्यास सुरुवात केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या चळवळीतही बाबा सक्रीय सहभागी झाले होते.
एकदा बाबा रस्त्यावरून घरी जात होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला शरीराचे अनेक अवयव झडून गेलेला, शरीरभर सलणाऱ्या जखमा घेऊन वेदनांच्या महापूरात पडलेला कुष्ठरोगी बाबांच्या दृष्टीस पडला. असहाय्य झालेला तो जीव पाहून बाबांचे अंत:करण हेलावले. बाबांच्या मनात त्यांच्याबद्दल करूणा निर्माण झाली.
घरी आल्यावर तो प्रसंग बाबांनी आपल्या पत्नीला सांगितला व आपल्या पत्नीच्या साथीने रात्रीच्या अंधाराला साक्ष ठेवून कुष्ठरोग्यांच्या जीवनातील अंध:कार नाहीसा करण्याचा संकल्प केला. समाजाने माणूसपण नाकारलेल्या असहाय्य जिवांना बाबानी आश्रय दिला. भामरागड, हेमलकसा येथे कुष्ठरोग्यांसाठी आश्रम उभारले. हाताची बोटे झडलेल्या कुष्ठरोग्यांना बाबांनी आपल्या हाताने जेवू घातले. त्यांची शुश्रृषा केली कुष्ठरोग्यांवर औषधोपचार करण्यासाठी दवाखाना उभारला. कुष्ठरोग्यांच्या अर्थहीन जीवनात निरनिराळ्या उपक्रमांमधून अर्थपूर्ण प्रेरणा निर्माण करण्याचे काम बाबांनी केले. कुष्ठरोग्यांच्या मदतीने बाबांनी जंगलातल्या माळरानावरही शेती फुलवली. कुष्ठरोग्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांना विविध हस्तव्यवसाय शिकवले. कुष्ठरोगापासून मुक्ती मिळालेल्यांसाठी बाबांनी आनंदवन' ही वसाहत स्थापन केली.
कुष्ठरोग्यांबरोबर समाजातील इतर दु:खितांसाठीही बाबांनी प्रयत्न केले. अनाथ, वृद्ध, अपंग यांनाही बाबांनी आनंदवनात आसरा दिला व त्यांच्या जीवनातही आनंद निर्माण केला. जंगलातील पशु-पक्ष्यांनाही आनंदवनात आश्रय दिला. अपंगाचे दुःख डोक्यावर घेऊन बाबा 'भारत जोडो' अभियानामध्ये अनवाणी पायाने भारतभर फिरले. समाजाबरोबरच राष्ट्राचीही सेवा करणारा हा कर्मयोगी निष्काम सद्भावनेने दुरित मने सांधत-सांधत आणि 'स्वान्त सुखाय' समाजाच्या अंतरंगातही प्रकाशाची राऊळे बांधत-बांधत काळाच्या पडद्याआड गेला.
जय हिंद!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.